दि.१८ रॅगिंग हा प्रकार छोटय़ा गोष्टींनी सुरू झाला होता. त्यात ओळख करुन देण्याचा उद्देश होता. सध्या त्याचे स्वरुप गंभीर होऊ लागले आहे. शाळा व महाविद्यालयीन शैक्षणिक विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचत आहे.त्यांच्यात धास्तीची, भयाची, लज्जेची किंवा अडचणीत आल्याची भावना निर्माण होत आहे. यामुळे रॅगिंग हे अक्षम्य कृत्य आणि गुन्हा म्हणून गणले जाते. यावर प्रभावी उपाय म्हणून शाळा व कॉलेज स्तरावर रॅगिंग विरोधी समिती व पथके नेमणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध वक्ते ॲड. राजु भोसले यांनी केले.
श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय , म्हसवड येथील. “अँटी रॅगिंग कमिटी ” व “इंटरनल कंप्लेंट कमिटी” विभागाच्या वतीने “रॅगिंग विरोधी कायदे व नियम मार्गदर्शन शिबिर” आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲड. राजू भोसले प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दीक्षित होते. यावेळी अँटी रॅगिंग कमिटी चेअरमन प्रा. डॉ. प्रज्ञा माने, इंटरनल कंप्लेंट कमिटी चेअरमन
प्रा. तांबोळी निलोफर बी. मॅडम कॉलेज सीडीसी मेंबर प्रा. डॉ. चव्हाण जे एस मॅडम , प्रा. मनीषा बोबडे , प्रा. मैंद बी. बी. , प्रा. डॉ. मीनल कुलकर्णी , प्रा. डॉ. सुजाता देशमुख , प्रा. अंजली माने हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ॲड. राजू भोसले म्हणाले, रॅगिंग चे प्रकार रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगासह अनेक राज्यांनी त्यांच्या स्तरावरून कायदे केले आहेत. परंतु रॅगिंग चे प्रकार अजूनही थांबलेले नसल्याचे बऱ्याच प्रसंगातून दिसून येत आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये गरीब व असाह्य विद्यार्थ्यांना सगळ्यांसमोर नाचायला, गायला लावणे, कोणालाही शिव्या द्यायला लावणे, मुला-मुलीला प्रपोज करणे, छेड काढणे, शिक्षकांची टिंगल किंवा खोडय़ा करायला सांगणे, काही तरी खाण्या-पिण्यास सांगणे , अमली पदार्थाचं सेवन करण्यास सांगणे, अश्लील दृक्श्राव्य फिती पाहावयास सांगणे, अश्लील कृतीत सहभाग घ्यावयास सांगणे, शारीरिक इजा पोहोचवणे असे प्रकार सुरु असल्याचे निदर्शनात येते. यामुळे विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त होते. आपल्यावर रॅगिंग होत असल्याचं पीडित विद्यार्थ्याने न सांगितल्याने हा प्रकार वाढत जातो. त्यातून अनुचित गोष्टींना तोंड फुटतं. त्याचा शेवट वाईट पद्धतीने होतो. हे सगळं टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळीच या गोष्टींबाबत बोलणं गरजेचं आहे. आपल्यासोबत चुकीचं घडत आहे, असं जाणवल्यास तत्काळ शाळा प्रशासनाशी संपर्क साधायला हवा. या प्रकाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना देणंही तितकंच महत्त्वाचं असतं.
विद्यार्थ्यांनी आपल्यावर होणाऱ्या रॅगिंगविषयीची कल्पना शिक्षक, प्राचार्य, अँटी-रॅगिंग समितीला वेळीच दिल्यास पुढील चुकीच्या गोष्टी टाळता येऊ शकतात.
यावेळी महाविद्यालयीन “अँटी रॅगिंग कमिटी” व “इंटरनल कंप्लेंट कमिटी” च्या वतीने विद्यार्थी तक्रार निवारण पेटीचे अनावरण ॲड. राजू भोसले यांच्या हस्ते व समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांसहित बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँटी रॅगिंग कमिटी चेअरमन प्रा. डॉ. प्रज्ञा माने यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत इंटरनल कंप्लेंट कमिटी चेअरमन प्रा. तांबोळी निलोफर मॅडम यांनी केले. शेवटी आभार प्रा. मैंद बी. बी. यांनी मानले.