दि.१५ अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथे ग्रंथालय व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधत ऑनलाईन व्याख्यान व दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने नांदेड येथील डॉ. रणजीत धर्मापुरीकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ हे होते.
या प्रसंगी बोलताना डॉ. रणजीत धर्मापुरीकर म्हणाले की, आपल्या देशातील किंवा विश्वातील जी कोणी महान व्यक्तिमत्व होऊन गेली. अथवा आजही आहेत त्या सर्वांनी ग्रंथांना, वाचनाला आपल्या जीवनात खूप महत्त्व दिले. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी आयुष्यभर पुस्तकाची संगत जोपासली. ग्रंथांना आपले सर्वस्व मानले. जागतिक स्तरावर हंगेरी सारखा देश वाचन संस्कृतीमध्ये प्रचंड पुढे आहे. त्या तुलनेत आपण फार मागे आहोत, वाचन संस्कृतीशिवाय मूल्यनिर्मिती अथवा वैचारिक समाज उभारणी अशक्य असते, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन त्यांनी केले.
प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ यांनी वाचन संस्कृती दिवसेंदिवस कमी होत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन करण्यास भरपूर वाव आहे. प्राचीन, मध्ययुगीन ते आजवरचे महत्त्वाचे ग्रंथ ग्रंथालयात उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच वाचन संस्कृती जोपासावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय प्रमुख प्रा. सुनील भोसले यांनी केले. दरवर्षी असे उपक्रम महाविद्यालयात राबविले जातात. ग्रंथ प्रदर्शन भरून ग्रंथालयातील दुर्मिळ ग्रंथ सर्वांच्या पर्यंत पोहोचविले जातात. जेणेकरून वाचण्याची प्रेरणा जागृत होईल, असे ते म्हणाले. पाहुण्यांचा परिचय प्रा. महेश गोरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. दिलीप भिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पुनम लाखे यांनी मानले. कार्यक्रमास तसेच व्याख्यानास उपप्राचार्य डॉ. रमेश शिंदे, प्रा. एस एस औंढे, प्रा.पी.के.जाधव, डॉ. भारत पल्लेवाड, डॉ. संजय सूरेवाड, डॉ. प्रशांत लोखंडे, प्रा. संजय जाधव,प्रा. राजाभाऊ भगत, विजय काकुळते, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.