फलटण- तरडगाव येथील बौद्ध बांधवांवर जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याने लोणंद पोलीस स्टेशन या ठिकाणी २४ आरोपींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट व बी. एन. एस.कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. यातील १५ आरोपींनी फलटण मा.जिल्हा सत्र न्यायालयामध्ये रेग्युलर जामीन दाखल केलेला असून त्याची तारीख १३ मे २०२५ अशी आहे. ॲट्रॉसिटीतील फिर्यादी यांच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. बापूसाहेब शीलवंत, ॲड.विशाल रणदिवे,ॲड.नवनाथ भागवत (गिते), ॲड.अक्षय भागवत (गिते) यांची नियुक्ती करून हे न्यायालयात बाजू मांडणार आहेत. तसेच ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांवर क्रॉस खोटे गुन्हे दाखल केले होते यामध्ये अटक असलेल्या सर्वांना ॲड.बापूसाहेब शीलवंत यांनी जामीन केलेले आहेत.
तरडगाव ॲट्रॉसिटी प्रकरणातील सर्व आरोपींवरती कडक कारवाई होण्यासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस एन.डी.एम.जे या संघटनेचे टीमने ॲड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. गुन्ह्याची सर्व हकिकत जाणून घेऊन महत्वपूर्ण निवेदन बनवले. महाराष्ट्र राज्य सचिव वैभव गीते, विशेष सरकारी वकील बापूसाहेब शीलवंत, सातारा सम्राट या वृत्तपत्राचे संपादक गोविंद मोरे,दलित पॅंथर चे नेते सु.ग.साबळे, युवा नेते जय भैय्या माने व सहकाऱ्यांनी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांची भेट घेण्यात आली व गुन्ह्याच्या बाबतीत सखोल चर्चा करून सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. फिर्यादी व साक्षीदारांना पोलीस संरक्षण तरडगाव मध्ये शांतता समितीचे बैठक बेकायदेशीर विनापरवानगी ऑर्केस्ट्रा,कार्यक्रम घेणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करणे,यामध्ये वैभव गीते व बापूसाहेब शीलवंत यांनी पिडीत कुटुंबीयांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यापुढे बाजू मांडली.आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास सातारा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन सर्व हकीकत सांगणार असल्याची माहिती युवा नेते जय भैय्या माने यांनी दिली.